Thursday, August 5, 2010

पोर्ट्रेट स्केच

हे एक साध्या पेन्सिलीने काढलेले पोर्ट्रेट स्केच आहे. परवा एका आमच्या संस्कार भारतीच्या कार्यक्रमात मध्यंतरात थोडा वेळ होता. मी माझ्या मैत्रिणीला सहजच विनंती केल्यावर ती पोज द्यायला तयार झाली आणि पंधरा ते वीस मिनिटात हे पोर्ट्रेट स्केच तयार झाले !

Sunday, July 25, 2010

आजचे निसर्ग-चित्रण व व्यक्तीचित्र

आज रविवार लॅंडस्केपिंग ला जाण्याचा वार. खरे तर आज डेक्कन कॉलेजला जायचे होते पण एक तर ते खूप लांब आहे तसेच गेले तीन चार दिवस सतत पाउस येतोय त्यामुळे अंगात आळस मुरलाय, तेव्हा जवळच गोखले इन्स्टीट्युट जायचे ठरले. तरीहि पावसात बाहेर पडायचा कंटाळाच आला होता.... म्हणजे स्कुटर काढा, रेनकोट म्हणजे खोगीर अंगावर चढवा... वगैरे.

काल एक नवीन वृध्दत्वाकडे झुकलेले गृहस्थ आमच्या शनिवारच्या वर्गा्ला जॉईन झालेत, मी त्यांना फोन करीत आज येणार आहेत काय विचारले तर ते निघत होते व तेच म्हणाले की त्यांना मला पिक अप करू दे का ? त्यांना दिसली नसली तरी मी माझी मान जोरात हलवली व लगेच तयार होत वाटेत पोहोचलो!

तसे आम्ही आज फार जण नव्हतोच ६-७ च होतो त्यात हे व अजून एक नूरभाई अगदिच नवीन होते. मग पहिली काही मिनीटे त्या दोघांना प्राथमिक माहीती व स्केचिंगच्या महत्वाच्या बाबी सांगत त्यांना थोडे अवगत केले व मी माझ्या कामाकडे वळलो. एक स्पॉट निवडून स्केचिंग सुरू केले व रंगवायला लागणार तेव्हढ्यात दोघे माझ्याजवळ येऊन मी काढलेल्या स्केचिंगवर व थोड्या वेळा पुर्वी सांगीतलेले मुद्दे ह्यावर चर्चा झाली व त्या दोघांनी आता मी कसे रंगवतो हे पहाण्यासाठी तेथेच ठाण मांडले. हळू हळू एकीकडे गप्पा चर्चा होत चित्र आकार घेऊ लागले. हेच ते चित्र !



आज दुसरे आलेल्या नूरभाईंच्या व्यकिमत्वाने मला आकर्षित केले होते. खरं म्हणजे त्यांना लवकर माघारी वळून बाहेर गावी परतायचे होते पण थोडीशी रिक्वेस्ट केल्यावर ते तयार झाले. बरेच दिवसात जलरंगात व्यक्तिचित्र केलेले नव्ह्ते. थोडी धाकधूक होतीच. शिवाय पावसाळ्यात जलरंग लवकर वाळत नाही, थोड्याश्याही चुकीने चित्र बाद होऊ शकते तरीही हिय्या करीत सुरुवात करून पूर्णही केले.

Saturday, July 24, 2010

मागोवा

मागिल लेख लिहून जवळ जवळ तीन हून जास्त महिने झालेत. ह्या मधील काळात कित्येक घटना घडल्यात त्याचा धावता मागोवा घेण्याचा प्रयत्न ह्या लेखात  करीत आहे. अलिकडे मी पूर्ण पणे संस्कार भारतीमय झालॊ आहे. तेव्हा ह्यातील बहुतांशी घटना संस्कार भारतीशी संबंधित असणार हे उघड्च आहे. बाकी गुरुवार शनिवार व रविवार हे चित्रकलेशी संबंधित दिवस अर्थातच चुकणे शक्य नव्हते त्यामुळे ह्या लेखा मध्ये मधून मधून माझी काही चित्रे पेरलेली असतीलच.
१) सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे आत्ता पर्यंत पुण्यातील रमणबाग शाळेत गेली कित्येक वर्षे न चुकता स्केचिंगचे वर्ग दर शनिवारी दुपारी ३ ते ५ ह्या वेळेत होत आलेले आहेत. पण आम्हा कोथरूडवासियांना हा वर्ग जरा लांब पडत असे तरीहि गेल्या सात वर्षात मी हा वर्ग कधीच चुकवलेला नव्हता. आता कोथरुड च्या श्री मृत्युंजयेश्वर मंदिरात तस्साच वर्ग १७ एप्रिल पासून त्याच वेळेत नव्याने सुरू केलेला आहे व विशेष म्हणजे त्याची जबाबदारी माझ्यावर आहे. दर शनिवारी हा वर्ग व्यवस्थित चालू असून सरासरी १३-१५ स्त्री पुरुष नेहमी त्याचा लाभ घेत आहेत. उदघाटनाचा सोहळा पहाच...
http://roupya.blogspot.com/2010_04_17_archive.html

मध्यंतरी आम्ही काहीजण निसर्ग चित्रणासाठी हंपी म्हणजे जुन्या विजयनगर साम्राज्याच्या राजधानीत गेलो होतो. तिथे इतस्तत: मोडकळीला आलेल्या वास्तू व अवशेष आहेत. शिवाय तिथे प्रचंड शिला पडलेल्या आहेत. हा भाग म्हणजे रामायण कालातील सुग्रीवाचीहि राजधानी येथेच होती. खालील चार चित्रे तिथे काढलेली आहेत.









२) लगेचच जून महिन्या पासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी संध्याकाळी ७ ते ८ ह्यावेळेत ह्याच श्री मृत्युंजयेश्वर मंदिरात नृत्य साधना हा कार्यक्रम एक वर्षासाठी सुरू केला आहे ज्याची जबाबदारी सौ. मुग्धा मुळ्ये ह्यांनी पेलली आहे. दर कार्यक्रमाचे वेळी एक प्रसिध्द नृत्यांगना आपली नृत्य साधना देवा पुढे सादर करणार आहे. ह्या पुर्वी ह्याच मंदिरात असाच एक वर्षभर संगीत साधनेचा कार्यक्रम सादर केला गेला होता. आपल्या सर्व कला नाहीतरी देवा पुढे समर्पणाच्या भावनेतून सादर होत होतच फळा-फुलाला आलेल्या आहेत.

ह्यातील पहिले पुष्प सौ. स्वप्ना कुर्डुकर ह्यांनी ५ जून २०१० रोजी
http://roupya.blogspot.com/2010/06/blog-post_07.html

तर दुसरे पुष्प अमृता सहस्रबुध्दे ह्यांनी १० जुलै २०१० रोजी समर्पित केले.
http://roupya.blogspot.com/search?updated-min=2010-01-01T00:00:00%2B05:30&updated-max=2011-01-01T00:00:00%2B05:30&max-results=12

३) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांचे समग्र चरित्र स्फुर्तिदायक आहे. त्यातील त्यांची त्रिखंडात गाजलेली उडी अत्यंत रोमहर्षक घटना जिला ८ जुलै २०१० रोजी शंभर वर्षे पूर्ण झालीत त्या निमित्ताने गेल्या १८ जुलै २०१० रोजी गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात " तेजोनिधी सावरकर " हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. ह्या कार्यक्रमात शब्द, संगीत व नृत्यातून त्याचे ओजस्वी जीवनाचे दर्शन घडवले गेले.
त्याचे समग्र वर्णन दैनिक जागरण सिटी प्लस मध्ये वाचायला येथे मिळेल.
http://www.jagrancityplus.com/storydetail.aspx?cityid=22&articleid=27704&editionid=149&catgid=6


असे नित्य नवे व कल्पक कार्यक्रमांची रेलचेल असल्यावर लेख लिहिण्यात दिरंगाई होणे साहजिकच ना ?

Sunday, April 4, 2010

आजचा रविवार ( ४ एप्रील २०१०)



आज आम्ही संस्कार भारतीचे संभाजी विभागाचे सभासद फर्ग्युसन महाविद्यालयात निसर्ग चित्रणाला गेलॊ होतो.ह्या महाविद्यालयाला खूप मोठा इतिहास आहे. खूप जुन्या जुन्या इमारती आहेत, तसेच ह्याला निसर्गाचे चांगलेच वरदान आहे व ते अजून टिकवून ठेवलेले आहे हे आपले महत्‌भाग्य आहे.

मी एक कोपरा शोधला जेथे भरपूर सावली होती. विशेष म्हणजे आज महाविद्यालयातील गर्दी तुरळक्च होती, अर्थात त्याने आम्हाला फारसा फरक पडत नाही. हा मुख्य इमारतीच्या दाव्या बाजूचा कोपरा होता.

मी एक पेन्सिलीने रेखाचित्र काढले ज्यात मुख्यत्वे करून उजेड व अंधाराचे वर्गीकरण दाखवायचा प्रयत्न केला आहे.
.


.


नंतर लगेचच हे चित्र रंगवायला घेतले. वरच्या चित्रात पेन्सिलिने दाखवलेले चित्रातील भाग रंगात दाखवले आहेत.
.
.



 आता खाली देत असलेले छायाचित्र त्या भागाचे आहे. अर्थातच ते नंतर व संदर्भा साठी घेतलेले आहे.

Tuesday, March 30, 2010

चित्र असेही बनते !

परवां रविवार दिनांक २८ मार्च ला आम्ही निसर्ग चित्रणा साठी फर्ग्युसन महाविद्यालयात जमलो होतो, पण का कोण जाणे कुठलेच दृश्य मनाची पकड घेत नव्हते. आज कसलीशी परिक्षा असावी त्यामुळे इतस्तत:मुले व मुली हिंडत,  वाट पहात जमेल तसा अभ्यास करीत बसलेल्या होत्या. मी मनात शेवटी असा विचार केला की अश्या पध्दतीने समुदाया चे रेखन कधी करायला मिळणार? मी भराभर त्यांची रेखाचित्रे काढू लागलो. ही त्यातलीच  काही रेखा चित्रे  खाली दिली आहेत.






त्या नंतर मुख्य ऍम्फि थिएटर च्या बाजूच्या व्हरांडाचे खांब व कमानी कडे लक्ष गेले व हा विषय मनाला भावला तसेच त्यात आता जिवंत पणा यावा ह्या हेतूने आधीच्या रेखाचित्रांतील काहींना ह्या चित्रात सामावून घेत आजचे चित्र पूर्ण केले.



मी नेहमीच प्रत्यक्ष जागेवर जाऊन निसर्ग चित्रण करीत असतो. मी स्वत: कधीच छायाचित्रांचा उपयोग करीत नाही, मात्र मधे आधे कीवा शेवटी केव्हातरी त्या दृश्याचे छाया- चित्रण करून ठेवतॊ संदर्भा साठी.



आता आपण सांगायचे आहे की आपणास हे चित्र कसे वाटले ते ?

Wednesday, March 17, 2010

स्केचेस पेनने

आज मी काही पेन ने काढलेली स्केचेस येथे देत आहे. पेनने स्केच काढताना जवळ जवळ संपूर्ण स्केच आपल्या मनात तयार झालेले असले पाहीजे.हे स्केचिंग करताना दुरुस्तीला वाव रहात नाही. तसेच जो आकार काढू त्याला निश्चिती आलेली असावी...येतेच.






Friday, February 26, 2010

वस्तू- व -व्यक्ती चित्रणाचे वर्ग कोथरूड,पुणे येथे ,

संस्कार भारती, संभाजी विभाग पुणे, ह्यांच्या विद्यमाने कोथरूड येथे वस्तू आणि व्यक्ती चित्रणाचे वर्ग शनिवार दिनांक २७ मार्च २०१० पासून प्रत्येक शनिवारी दुपारी ३ ते ५ ह्यावेळेत बाल शिक्षण शाळेत सुरू करीत आहोत. ह्या वर्गाचे शुल्क अत्यल्प म्हणजे रुपये २००/- फक्त पूर्ण वर्षासाठी असणार आहेत ( एप्रील ते मार्च ). ह्या वर्गाला येणाऱ्यांना दर रविवारच्या  निसर्गचित्र वर्गालाही उपस्थित रहाता येणार आहे. ह्या वर्गाला अधून मधून मान्यवर चित्रकारांचे मार्गदर्शनही उपलब्ध होणार आहे. ह्या वर्गात १५ वर्षा वरील कोणाही स्त्री पुरूषास प्रवेश घेता येईल. ज्यांना चित्रकलेची मनापासून आवड आहे व नित्य नियमाने सराव करण्याची इच्छा आहे, अश्यांना ह्या वर्गाचा निश्चित लाभ करून घेता येईल. इच्छूकांनी श्री.सुरेश पेठे ह्यांचेशी
ईमेल sureshpethe@gmail.com
अथवा ९८५०४८८६४० ह्या क्रमांका वर संपर्क साधावा.

Wednesday, February 24, 2010

अजून काही रेखांकने

सध्या मी गेले काही दिवस माझ्या मुलीकडे दत्तवाडी येथे रहायला गेलेलो आहे. त्यामुळे माझ्या सकाळच्या हिंडण्याच्या मार्गातही बदल झाला. सिंहगड रोड वरील पु.ल.देशपांडे उद्यान हे माझे ह्या रोड वरील  आवडते ठीकाण. अर्थात माझ्या स्केचबुक लाही पु.ल. ची सहल करावी लागलीच !


१) हे उद्यान मुख्यत्वे चालण्यासाठी आहे. हिरवळ फक्त पहायची ! चालायचे मात्र कॉंक्रीट च्या पायवाटे वरूनच ! अश्याच एका वळणावरील हे रेखांकन .



२) हे ही अश्याच एका वळणावरील रेखांकन ! खालून मंजूळ आवाजात पाणी पडू का नकॊ अश्या थाटात , तर वर लाकडाचा भास निर्माण होईल असा कॉंक्रीटचाच पुल वरून ’खळखळ’ पहाण्य़ासाठी केलेला.


 
३) हा एक मानव निर्मित छोटासा धबधबा ! मला रेखांकनाला विषय तर मिळाला. एकूण हे पूर्ण उद्यान जपानी पध्दतीने केलेले आहे. विस्तृत भाग व हिरवळी मुळे मन मात्र प्रसन्न होते.






४) हे मात्र मी जलरंगात केलेले चित्र आहे. थोडासा रंगांचा शिडकावा कसा आहे ह्याची कल्पना यावी हा उद्देश. त्या साठी काढलेले एका कृत्रिम पुलाचे चित्र !  for a change.
कसे वाटले जरूर कळवा मात्र !


Monday, February 22, 2010

व्यक्तीचित्रण

आज मी येथे पेन्सिलीने काढलेल्या एका व्यक्ती चित्रणाचे चार भागात विवरण देण्याचा प्रयत्न करीत आहे. अश्या पध्दतीने करीत असलेले विवरण आपणास किती आवडले ? तसेच त्यात आपणास काही त्रुटी आढळली आहे का? आपणास काही शंका असेल तर त्या इथे विचारल्या जाणे अपेक्षित आहे, म्हणजे त्यावर अधिक चर्चा करता येईल.



१) इथे फक्त चेहऱ्याच्या बाह्य आकारा कडे लक्ष दिले असून, ते कागदावर रेखाटताना चेहेऱ्या वरील महत्वाच्या अवयवां ची निश्चिती करण्याचा प्रयत्न केला आहे.







२) पुढल्या भागात चेहऱ्यावर पडलेल्या उजेडा मुळे तयार झाल्रेले फिकट व गडद छटांचे भाग ओळखून हळू हळू त्याची विभागणी करीत ते कागदावर उमटविण्याचा येथे प्रयत्न केला आहे.



३) ह्या तिसऱ्या भागात बहुतांश भाग पूर्ण करीत आणलेला आहे, मात्र एक डोळा लहानल्या सारखा वाटतोय.



4)४) ह्या चवथ्या भागात तो भाग खोड रबराचे साह्याने हळूवार हाताने दुरूस्त केला आहे, खरे तर मूळ रेखाटनातच हे काम व्हायला गवे होते. बाकीच्या भागाच्या छटा जुळवून चित्र पूर्ण केले आहे.





वरील चित्र एका फोटोवरून काढलेले असले तरी समोर एखाद्या व्यक्तीला बसवून  देखिल ह्याच पध्दतीने चित्र काढता येईल


Monday, February 15, 2010

पेन्सिल स्केचिंग्स




गेल्या आठवड्यात तील .....ही पहा काही स्केचिंग्स ची झलक.










Friday, February 5, 2010

ज्येष्ठ नागरिक संघ वाढदिवस

२७ जानेवारी, त्या दिवशी आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचा १७ वा वाढदिवस होता. मी त्या आधी चार दिवस नाशिक - त्र्यंबकेश्वर ला आमच्या संस्कार भारतीचे निवासी शिबीर होते तिथे गेलेलो होतो.
संघाच्या वाढदिवसाला सकाळी ९ ला सुरुवात झाली. नास्ता होऊन खेळ आदि सुरू झाले. मी मात्र माझे स्केच बुक घेतले व स्केचेस सुरू करणार तोच माझे मित्र माझ्या जवळ आले. माझ्या कडून चित्र काढून घेण्यास ते  उत्सुक होते. मधला वेळ अत्यंत कमी म्हणजे जेम तेम अर्धा तासच होता पण मी तयार झालो. तेव्हढ्या वेळेत तिघांची स्केचेस काढून झाली. खाली ती क्रमाने देत आहे,

.







आणि मग ’भाषणांचा’ कार्यक्रम सुरू झाला पण मला निमूट्पणे ऐकत बसण्या खेरिज तरुणोपाय नव्हता.

त्या नंतर मात्र गायनाचा कार्यक्रम  सुरू झाला. गायक होते पं. दरेकर पं. अभिषेकींचे शिष्य . मी सभागृहात शिरे पर्यंत ते तुडुंब भरून गेले . मग मात्र गायकाच्या डाव्या बाजू कडील मागची संयोजकांची खुर्ची मी काबीज केली ! हळू हळू गायन रंगात येऊ लागले...तसे माझे स्केच बुक  मी बाहेर काढले व गायना बरोबर चित्र काढण्यात मी ही रंगत गेलॊ व सरते शेवटी आम्ही सगळेच एकदम समेवर येऊन थबकलो !
.

                                श्री दरेकर

‍हॆच ते चित्र ! आणि हीच त्यावरील त्यांची सही....‍

Wednesday, January 20, 2010

स्केचिंग आणि लॅंडस्केपिंग...१६_१७ जानेवारी

शनिवारी स्केचिंग ला पोचलो खरा पण खूप उशीरा पोचलो त्यामुळे नेहेमी इतकी काही झाली नाहित काढून. पण आजच्या स्केचिंग मधे एक वैशिष्ठ्य होते. शाळेतील दोन मुले स्केचिंग ला मॉडेल म्हणून तयार तर झाली पण मी आधी तू मग असे सुरू झाले त्यांचे तेव्हा दोघांनाही एकदम बसविले. आत्ता पर्यंत एकेकाचे काढीत असू !


मग आधी एकाचे स्केच कच्चे काढले व अंदाज घेत दुसऱ्याचे काढू लागलॊ! शेवटी दोघांमुळे बनलेला असा एकूण एक विषय आहे असे समजले की मग एकमेकां मधील संबंध लक्षात यायला लागतेव चित्र पूर्ण करता येते.





हे दुसरे चित्र एका रेलून बसलेल्या माणसाचे आहे. बसण्याची ढब  नेहेमी पेक्षा खूपच वेगळी आहे. हे चित्र काढताना त्या व्यक्तीच्या एकूण हावभावी कडे लक्ष जास्त ठवले होते, चेहऱ्यातील साधर्म्य जरा दुर्लक्षीत केले.







रविवार, हा फारच धांदलीचा होता. सकाळी जमेल तसे काव्यांजलीचा कार्यक्रम सारस बागेत तर दुपारी पु.ल.देशपांडे उद्यानात होणारा मराठी ब्लॉगर्स चा स्नेह-मेळावा त्याचा तर मी आयोजक होतॊ!!  म्हणून मी आज लॅंडस्केपिंगल सारस बागेत जाण्याचा निर्णय घेतला.


खालील दोन्ही चित्रे सारसबागेतील जलरंगात काढ्लेली आहेत.










Sunday, January 10, 2010

माझे पहिले स्केच

होय गेले कित्येक दिवस हा ब्लॉग बंद होता. अनेकांनी त्याबाबत विचारणा पण केली. गेल्या ऑगस्ट मध्ये पुनरागमन करण्याचे ठरवून तशी पोस्ट पब्लिश केलीही , पण कारण काहीही असो हा ब्लॉग पुन्हा चालू करायचे राहून गेले.. गेल्या वर्षात मी माझ्या ऑर्कुट वरील अल्बम मध्ये रिज एक नविन चित्र टाकण्याचा संकल्प ठरवला व नुकताच पूर्ण हि केला . व हा ब्लॉग चालू न करण्याला निमित्त मिळाले. आता चालू वर्षी  हा ब्लॉग आजपासूनच मी हा ब्लॉग पुन्हा चालू करीत आहे.

ह्या आधीच्या पोस्ट मधून स्केचिंग वर बरीच चर्चा केली आहे , आज मी माझे पहिलेच पेन्सिल  स्केच  टाकून सुरुवात करीत आहे.

 आम्ही पुण्याचे  संस्कार भारतीचे सभासद दर शनिवारी खास स्केचिंग साठी जमतो तर रविवारी एखाद्या स्पॉट वर जाऊन  तिथे निसर्ग चित्रे काढण्यात रमतो . कधी कधी रविवारी एखादे रंगीत स्केच पण काढून होते. तेव्हा साधारण पणे दर  सोमवार पर्यंत माझे एक तरी स्केच घेऊन इथे यायचेच असे ठरवले आहे.

 आज मी माझ्या एक स्नेहींना प्रथमच वर्गावर घेऊन गेलो.होतो. त्यांनाहि  हा अनुभव नवा होता. त्यांचे मी काढलेले पोर्ट्रेट--पेन्सिल स्केच खाली  देत आहे.