Wednesday, October 22, 2008

स्केचिंगची तयारी (३)

स्केचिंगची तयारी (३)

स्केचिंग बहुतांशी जलद करावे. जलद स्केचिंग हे काही संपूर्ण चित्र असत नाही. काही रेषा जीवनाचा आशय व्यक्त करीत असतात तर काही रेषा मनातील तरंग ... तरल भाव कागदावर उतरवित असतात. एक गोष्ट कायम लक्षात असू द्या,

आपले डोळे पहाण्याचे काम करीत असतात.

आपले मन ते सर्व मनःपटलावर चित्र रेखाटीत असतात

तर ...... आपले हात, बिच्चारे मनाच्या हुकुमांचीतामिली करतात.

तेव्हा आपल्या मनाची धरसोड वॄत्ती हीच आपल्या स्केचिंग ला अडथळा करू शकतात. पुढील काही तत्त्वे उराशी बाळगलीत तर तुम्हीही उत्तम व जलद स्केचिंग कराल अशी माझी श्रध्दा आहे.

प्रत्येक वेळी स्केच काढतांना त्या वस्तू - गोष्टी कडे डोळस पणे पहा व त्याचे मनाने मनःपटलावर स्केच करीत रहाण्याचा छंद जोपासा. त्यासाठी कागद वा पेन्सीलची ही गरज नाही ! एकीकडे स्केव्हिंग चा सराव चालू असला कीच हे तुम्हाला जमेल. स्केचिंगसाठी एखादी वस्तू निरखणे म्हणजे त्याचा आकार , अवकाश, त्यातील ठळक वैशिष्टे , ह्याचा तुलनात्मक अभ्यास तुमचे मन मनातल्यामनात आपोआप करू लागेल आणि तेव्हाच तुमचे डोळेही स्केचिंगसाठी ( डोळसपणाने) उघडलेले असतील.

(क्रमशः)

स्केचिंगची तयारी (२)

स्केचिंग ची तयारी केलीत. अगदी मनाची सुध्दा तयारी झाली. मनात काय काढू आणि काय नाही अशी घाई पण झाली. विषयांची पण भाईगर्दी झालीय ! हो ना ?

थोडे थांबा , विचार पक्का ..... मारा शिक्का !

अ) चित्राला सुरूवात करीत आहात, सरळ वर पासून खाली पर्यन्त स्केचिंग करीत सुटु नका.

ब) विषयाच्या तपशिलात एकदम शिरू नका.

क) कुठल्याही कोणीतरी काढलेल्या चित्राची कॉपी अजिबात करू नका.तुमच्या कल्पनांना मोकळे सोडा त्यांचा भरपूर वापर करा. येणारी प्रत्येक अनुभूती आठवा व तिला आत्मसात करायचा प्रयत्न सतत चालू राहूदे. कलाकार हा नवनिर्मीती करणारा आहे मात्र गुरफटू नका , वाहावत जाऊ नका आपला पहीला उद्देशाचे सतत भान असुद्या नाहीतर त्यातून भलतंच काहीतरी बाहेर येईल जे तुम्हाला ही अगम्य असेल !

मन उघडे ठेवा जे उमगले नसेल ते आपोआप उमगेल सचोटी हा कलेचा खरा व मुख्य आधार आहे. निराशा , तिला अजिबात जवळ फिरकू सुध्दा देऊ नका.सगळेच प्रतिथयश कलाकार या अवस्थेतून गेलेले आहेत, तुम्हीच काही पहीले नाहीत.(क्रमशः)

Tuesday, October 21, 2008

स्केचिंगची तयारी (१)

स्केचिंगची तयारी

तुम्हाला खरोखरीच स्केचिंग शिकायचे आहे का ? मग प्रथम एक काम करा. आपल्या मनाशी दॄढनिश्चय करा व मनाशी ठरवा की ह्यापुढे मी उत्तमोत्तम स्केचिंग करणारच आणि येथून पुढे सतत कशाचे न कशाचे स्केचिंग करत रहाण्याचा संकल्प सोडून त्या प्रयत्नात कायम रहा.

स्केचिंग करतांना विषय समजून घ्या. त्यात सर्वात महत्त्वाचे काय भावले व त्यातील आपण काय व किती दाखवू शकू जेणे करून पहाणार्‍याला तो विषय उमजेल ह्यावर थोडासा विचार करा. काही महत्त्वाची पथ्ये पाळा म्हणजे तुम्ही सुध्दा आत्मविश्वासाने, तुमच्या स्वतःच्या शैलीत व वेगाने स्केचिंग करू शकाल.

एखादा चित्रविषय स्केचिंग करण्यासाठी त्यातील इंचन इंच भाग आणि प्रत्येक बारीक सारीक भाग दाखविणे अपेक्षित नसते. त्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि विषयाशी संबधित भागच तेव्हढा 'उचला'! सर्वकाही जसेच्या तसे कॉपी करू नका. काही भाग सूचक राहाणेच अधिक चांगले.

खालील गोष्टी विशेष ध्यानपूर्वक पहा :-

१) लांब रेषा...तुमच्या चित्र विषयात विविध भागातून ती गेलेली असेल. हि एक काल्पनिक रेषा आहे.पण तो कणा आहे. सवयीने तुम्ही तो शोधाल. बाकीचे भाग चित्रित करतांना त्याचा उपयोग होईल. ही रेषा उभी आडवी तिरपी किंवा काही वळणांचीही असेल.

२)रेषांची दिशा व कोन.

३)उभ्या आडव्या रेषाचे एकमेकांशी असलेले तुलनात्मक संबंध.

४)त्याच्यातील प्रमाणबध्दता.

५) चित्र विषयातील मोकळ्या जागा ( निगेटीव्ह स्पेस )

६)त्यात काही महत्त्वाचा आशय मिळतो का ? अधिकाधिक महत्त्वाच्या भावणार्‍या गोष्टी ठळक ठेवा. कमी महत्त्वाच्या अंधूक ठेवा वा गाळून टाका.काम करतांना चिकाटीने, पण उत्साहाने व उघड्या डोळ्याने आणि उघड्या मनाने सुध्दा पहा. आपण काढलेल्या स्केच शी सतत तुलना करा... परत पहा ...परत काढा.....परत पहा ...परत काढा !!(क्रमशः)

Friday, October 17, 2008

श्री वासूदेव कामत ह्यांचे पुस्तकातील महत्वाचे !'रेखांकन ते रेखाचित्र'

जागतिक किर्तीचे ख्यातनाम चित्रकार श्री. वासुदेव कामत ह्यांनी 'रेखांकन ते रेखाचित्र' नावाचे पुस्तक प्रसिध्द केलेले आहे. संस्कारभारती तर त्यांचे स्थान अत्युच्च आहेच. ते पुस्तक मुळातून वाचावे व नुसतेच वाचू नये तर त्यांनी दिलेल्या सुचना तंतोतंत अंमलात आणल्यात अणि सतत सराव ठेवला तर ही कला कष्टसाध्य आहे अशक्य अजिबात नाही.

Tuesday, October 14, 2008

स्केचिंगला साहीत्य

स्केचिंगला साहीत्य काय वापरायचं ?

तसं म्हणाल तर जे हातात असेल ते व जो कागद मिळेल तो !

पेन्सिल , शाई व पेन्, स्केच पेन, रंग ब्रश काहीही !
०.५ वगैरे ज्या क्लीपने वापरण्या जोग्या पेन्सिली असतात त्या नकोत. कारण त्याने रेषा एकाच जाडीची येते. काढतांना दाब देता येत नाही तुटते.
सर्वात सोयीचे आहे साधी सॉफ्ट पेन्सिल. पाहीजे तशी तासून घेता येते. शार्पनर वापरू नये. त्याचे टोक पटाशी सारखे करून घेतले तर रेषा मनासारखी कमी जास्त जाडीची काढता येऊन वेगळाले परिणाम साधता येतात.

मला काय वाटते !

 
 
 
 
Posted by Picasa

Monday, October 13, 2008

स्केचिंग_ सुरेश पेठे

आज कोजागिरी , सौ.अनुराधा म्हापणकर ह्या माझ्या सख्ख्या मैत्रिणीचा खराखुरा वाढदिवस व म्हणून हा ब्लॉग मी तिला अर्पण करीत आहे.

तसे म्हटले तर खडू माझ्या हाती दुसर्‍या वर्षी आला आणि आमच्या नाशिकच्या जुन्या वाड्याच्या जमीनी म्हणजे चित्रफळा , त्यातून मी शेंडेफळ व अशक्त, मला कोण बोलणार ? घरभर खडूने जमीनी रंगविणे हाच माझा उद्योग असायचा !

पुढे शाळेत ग्रेड परीक्षेच्या निमीत्ताने पेठे विद्यालयातील चित्रकला शिक्षक कै. डोंगरे गुरुजींची गांठ पडली. त्यानंतर माझे विषय बदलले आणि चित्रकलेशी सबंध ही संपुष्टात आला. पण त्यांनी तेव्हा दिलेली शिदोरी आजही पुरून उरत्येय ! कारण त्यानंतर शास्त्रशुध्द शिक्षण घेण्याची कधी संधी आलीच नाही. पण मिळालेल्या शिदोरीवर सेवानिवृत्तीपर्यन्त तग धरला.

पुढे इच्छा शक्तीने मात केली व माझा सबंध संस्कारभारती ह्या अखिल भारतीय संस्थेशी आला व पुन्हा माझ्यात चैतन्य संचारले. गेली पांच वर्षे ह्या संस्थेत राहून तेथिल तज्ञ कलाप्रेमींशी संघटन वाढवित नेले. नियमित सराव सतत अभ्यासी वृत्तीने साधना चालू झाली आज ही अखंड चालू आहे.

ऑर्कुट वर मात्र माझ्या सख्ख्या मैत्रिणीने जणू खेचित आणले अन मला कवीसुध्दां बनविले ! आता माझी ऑर्कुट वरील अजून एक मैत्रिण दीपा कुलकर्णी -- मिट्टीमणी ( बरोबर लिहीले ना ?) , स्केचिंग बद्दल शंका विचारीत असते व मी माझ्या कुवती प्रमाणे शंकांचे समाधान करण्याच्या प्रयत्नात राहतो. हा ब्लॉग मी केवळ तिच्या साठी बनविला आहे. व ह्या निमीत्ताने मला कितपत हा विषय समजला त्याची ही उजळणी होईल.

दीपा सारख्या ज्यांना ह्या विषयात रस आहे ते ह्यात भाग घेऊ शकतात. आपले विचार अभिप्रायाचे रूपाने मांडू शकतात. येथील अभिप्राय वा शंका, हे काही नवीन ज्ञान मिळविण्याचे उद्दीष्ठ ठेवूनच असाव्यात . शक्य तिथे मी मदत करीन, कारण मी अजूनही तुमच्या इतकाच विद्यार्थी आहे.

सुरेश पेठे