Tuesday, October 21, 2008

स्केचिंगची तयारी (१)

स्केचिंगची तयारी

तुम्हाला खरोखरीच स्केचिंग शिकायचे आहे का ? मग प्रथम एक काम करा. आपल्या मनाशी दॄढनिश्चय करा व मनाशी ठरवा की ह्यापुढे मी उत्तमोत्तम स्केचिंग करणारच आणि येथून पुढे सतत कशाचे न कशाचे स्केचिंग करत रहाण्याचा संकल्प सोडून त्या प्रयत्नात कायम रहा.

स्केचिंग करतांना विषय समजून घ्या. त्यात सर्वात महत्त्वाचे काय भावले व त्यातील आपण काय व किती दाखवू शकू जेणे करून पहाणार्‍याला तो विषय उमजेल ह्यावर थोडासा विचार करा. काही महत्त्वाची पथ्ये पाळा म्हणजे तुम्ही सुध्दा आत्मविश्वासाने, तुमच्या स्वतःच्या शैलीत व वेगाने स्केचिंग करू शकाल.

एखादा चित्रविषय स्केचिंग करण्यासाठी त्यातील इंचन इंच भाग आणि प्रत्येक बारीक सारीक भाग दाखविणे अपेक्षित नसते. त्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि विषयाशी संबधित भागच तेव्हढा 'उचला'! सर्वकाही जसेच्या तसे कॉपी करू नका. काही भाग सूचक राहाणेच अधिक चांगले.

खालील गोष्टी विशेष ध्यानपूर्वक पहा :-

१) लांब रेषा...तुमच्या चित्र विषयात विविध भागातून ती गेलेली असेल. हि एक काल्पनिक रेषा आहे.पण तो कणा आहे. सवयीने तुम्ही तो शोधाल. बाकीचे भाग चित्रित करतांना त्याचा उपयोग होईल. ही रेषा उभी आडवी तिरपी किंवा काही वळणांचीही असेल.

२)रेषांची दिशा व कोन.

३)उभ्या आडव्या रेषाचे एकमेकांशी असलेले तुलनात्मक संबंध.

४)त्याच्यातील प्रमाणबध्दता.

५) चित्र विषयातील मोकळ्या जागा ( निगेटीव्ह स्पेस )

६)त्यात काही महत्त्वाचा आशय मिळतो का ? अधिकाधिक महत्त्वाच्या भावणार्‍या गोष्टी ठळक ठेवा. कमी महत्त्वाच्या अंधूक ठेवा वा गाळून टाका.



काम करतांना चिकाटीने, पण उत्साहाने व उघड्या डोळ्याने आणि उघड्या मनाने सुध्दा पहा. आपण काढलेल्या स्केच शी सतत तुलना करा... परत पहा ...परत काढा.....परत पहा ...परत काढा !!



(क्रमशः)

2 comments:

Copyright जयंत कुलकर्णी said...

नमस्कार !
श्री.कामतांचे पुस्तक मिळ्ते का ? हा ब्लॉग मस्तच आहे. मी पुर्वी चित्रे काढायचो. काही दिवसापुर्वी प्रयत्न केला पण प्रामाणिकपणे सांगतो, कागद खराब करायला भीती वाटली. आपल्या लेखनामुळे ती जाईल असे वाटते.
जयंत कुलकर्णी.

सुरेश पेठे said...

जयंत,
अगदी प्रथम भीती सोडा. राहता राहिलं कागद खराब करण्याबद्दल पण स्केच काढलेला प्रत्येक कागदाचा तुकडा जपून ठेवा तोच तुमचा प्रगतीचा आलेख असेल ! तुम्ही पुण्यातील असाल तर संस्कार भारतीत येत चला ...उरली सुरली भीतीही नाहीशी होईल.