Monday, October 13, 2008

स्केचिंग_ सुरेश पेठे

आज कोजागिरी , सौ.अनुराधा म्हापणकर ह्या माझ्या सख्ख्या मैत्रिणीचा खराखुरा वाढदिवस व म्हणून हा ब्लॉग मी तिला अर्पण करीत आहे.

तसे म्हटले तर खडू माझ्या हाती दुसर्‍या वर्षी आला आणि आमच्या नाशिकच्या जुन्या वाड्याच्या जमीनी म्हणजे चित्रफळा , त्यातून मी शेंडेफळ व अशक्त, मला कोण बोलणार ? घरभर खडूने जमीनी रंगविणे हाच माझा उद्योग असायचा !

पुढे शाळेत ग्रेड परीक्षेच्या निमीत्ताने पेठे विद्यालयातील चित्रकला शिक्षक कै. डोंगरे गुरुजींची गांठ पडली. त्यानंतर माझे विषय बदलले आणि चित्रकलेशी सबंध ही संपुष्टात आला. पण त्यांनी तेव्हा दिलेली शिदोरी आजही पुरून उरत्येय ! कारण त्यानंतर शास्त्रशुध्द शिक्षण घेण्याची कधी संधी आलीच नाही. पण मिळालेल्या शिदोरीवर सेवानिवृत्तीपर्यन्त तग धरला.

पुढे इच्छा शक्तीने मात केली व माझा सबंध संस्कारभारती ह्या अखिल भारतीय संस्थेशी आला व पुन्हा माझ्यात चैतन्य संचारले. गेली पांच वर्षे ह्या संस्थेत राहून तेथिल तज्ञ कलाप्रेमींशी संघटन वाढवित नेले. नियमित सराव सतत अभ्यासी वृत्तीने साधना चालू झाली आज ही अखंड चालू आहे.

ऑर्कुट वर मात्र माझ्या सख्ख्या मैत्रिणीने जणू खेचित आणले अन मला कवीसुध्दां बनविले ! आता माझी ऑर्कुट वरील अजून एक मैत्रिण दीपा कुलकर्णी -- मिट्टीमणी ( बरोबर लिहीले ना ?) , स्केचिंग बद्दल शंका विचारीत असते व मी माझ्या कुवती प्रमाणे शंकांचे समाधान करण्याच्या प्रयत्नात राहतो. हा ब्लॉग मी केवळ तिच्या साठी बनविला आहे. व ह्या निमीत्ताने मला कितपत हा विषय समजला त्याची ही उजळणी होईल.

दीपा सारख्या ज्यांना ह्या विषयात रस आहे ते ह्यात भाग घेऊ शकतात. आपले विचार अभिप्रायाचे रूपाने मांडू शकतात. येथील अभिप्राय वा शंका, हे काही नवीन ज्ञान मिळविण्याचे उद्दीष्ठ ठेवूनच असाव्यात . शक्य तिथे मी मदत करीन, कारण मी अजूनही तुमच्या इतकाच विद्यार्थी आहे.

सुरेश पेठे

No comments: